चित्तूर - आंध्र प्रदेशातील लष्करी जवान टी. चंद्राबाबू याने स्वतःची जमीन अतिक्रमणापासून वाचवण्याची विनंती व्हिडिओद्वारे अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना केली आहे. तो चित्तूर जिल्ह्यातील इल्लापल्ली गावाचा रहिवासी आहे. त्याने त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावातील लोकांना व्हिडिओद्वारे आपली जमीन वाचवण्याची विनंती केली आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांनी असा जमीन बळकावण्याचा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे.
'मी चंद्राबाबू आणि माझा भाऊ देवेंद्र इल्लापल्ली गावाचे रहिवासी आहोत. आम्ही दोघेही मागील १७ वर्षांपासून लष्करी सेवेत आहोत. आमची ३ एकर जमीन शोभनबाबू आणि सांबशिव राव यांनी खोटी कागदपत्रे तयार करून हडपली आहे. ती परत मिळवण्यासाठी माझ्या आईला मदत करावी,' असे या जवानाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
'या लोकांनी माझ्या आईला तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. आम्हाला सुट्ट्या मिळत नसल्याने मी आणि माझा भाऊ घरी जाऊ शकत नाही. त्यामुळे मी गावातील प्रशासन आणि तरुणांना आमच्या आईचे संरक्षण करण्याची विनंती करत आहे. कृपया आम्हाला न्याय मिळवून द्या. तसेच, हा व्हिडिओ मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत शेअर करा,' असे या जवानाने पुढे म्हटले आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाला असून गाव प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. दरम्यान, मंडल महसूल अधिकारी भवानी यांनी जमीन हडपल्याचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. 'या दोन भावांच्या आईच्या आणि मोठ्या भावाच्या पत्नीच्या नावे थोडी जमीन आहे. मात्र, याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणतीही जमीन नाही. चंद्राबाबू याने ज्या व्यक्तींनी जमीन हडपल्याचा दावा केला आहे, ते त्याचे नातेवाईक आहेत. त्यांचा नातेवाईकांशी काही वाद सुरू आहे. मात्र, जमीन हडपण्याचा प्रकार घडलेला नाही,' असे भवानी यांनी म्हटले आहे.