भोपाळ - मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर मराठी भाषकांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, येथील मराठी भाषा आणि संस्कृती लोप पावत चालली आहे. मराठी संस्कृतीला पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न ग्वाल्हेरमधील काही मराठी कलाकार करत आहेत. "अप्सरा आली" हा लावण्यांचा कार्यक्रम १८ ऑगस्टला शहरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी देश-विदेशामध्येही लावण्यांचे कार्यक्रम केलेले आहेत.
ग्वाल्हेर शहरातील दाल बाजार भागातील नाट्य मंदिरात हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मराठी संस्कृतीवर आधारित २५ गाण्यांचे सादरीकरण होणार आहे. हिंदी भाषिकांचा विचार करुन कार्यक्रमामध्ये हिंदी गाणेही सादर होणार आहेत. मात्र, हिंदी गाणे मराठी संस्कृतीवर आधारित असतील. अडीच तास हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे.
मराठा सोशल ग्रुपचे अध्यक्ष बाळ खाडे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे दिगदर्शन प्रशांत चव्हाण करणार आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश मराठी संस्कृती जिंवत ठेवणे हा आहे. आत्ताच्या काळात तरुण पिढी पाश्चात्त्य संगीत आणि नृत्याकडे झुकली आहे. त्यांना भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी या कार्यक्रमामुळे मदत होणार असल्याचे मराठा सोशल ग्रुपचे अध्यक्ष बाळ खाण्डे यांनी सांगितले.
साधना कुत्ता, अंशुल वर्मा, संघमित्रा कौशिक, शिना मिश्रा, हिमांशु मोरे, यांच्यासह नृत्य दिगदर्शक प्रशांत चव्हाण आणि कार्यक्रमाचे संयोजक ऋतुराज सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या ९९ टक्के तिकिटांची विक्री झाल्याचे आयोजकांनी सांगितले.