नवी दिल्ली - भारतात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. दिल्लीच्या गुरुग्राममध्येही शुक्रवारी या विषाणूचा आणखी एक रूग्ण आढळून आला. गेल्या महिन्यात थायलंड आणि मलेशियावरून परतलेल्या एका २९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी बी. के. राजोरा यांनी दिली.
एमएनसी कर्मचारी असलेला हा व्यक्ती, थायलंडहून परतल्यानंतर ७ फेब्रुवारीला उद्योग विहार येथील कार्यालयात रूजू झाला होता. मात्र त्याच दिवशी अवघ्या दोन तासांनंतर तो दिल्लीच्या उत्तम नगर येथील आपल्या घरी गेला, अशी माहिती राजोरा यांनी दिली. आम्ही त्याला निरिक्षणाखाली ठेवले, आणि त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले. त्यानंतर आलेल्या अहवालात त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आम्ही तातडीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याची माहिती देऊन, त्याला एआयआयएमएस ट्रॉमा सेंटरमधील विशेष कक्षात हलवले, असेही त्यांनी सांगितले.
या रूग्णाने कार्यालयात आल्यानंतर काही लोकांची भेट घेतली होती, त्या लोकांचा शोध घेऊन त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांचा तपासणी अहवाल समाधानकारक आल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल, असे ते म्हणाले. यासोबतच, रूग्णाचे आई-वडील, पत्नी आणि मुलांनाही निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा : 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार'