नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या जातीय हिंसाचारात 'इंटेलिजन्स ब्युरो' या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आरोपी मोमीन उर्फ सलमानने विशेष तपास पथकापुढे गुन्हा कबूल केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.
सलमान आणि त्याच्या मित्रांनी मिळून अंकितची चाकूने भोकसून हत्या केल्याची माहिती त्याने चौकशीदरम्यान दिली आहे. विशेष पथक या प्रकरणी तपास करत असून त्याच्या मित्रांना पकडण्यासाठी छापेमारी करण्यात येत आहे.
फोनवरील संभाषणामुळे झाला उलगडा
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सलमानचा मोबाईलवर पाळत ठेवली होती. दरम्यान, सलमानने त्याची मोठी बहिण आणि भावाला फोन केला होता. त्यामध्ये एका व्यक्तीची हत्या केल्याबाबत तो फोनवर बोलला होता.
२४ फेब्रुवारीला दगडफेक केल्याचेही सलमानने चौकशी दरम्यान कबूल केले आहे. चांद बाग परिसरात दंगल सुरू असताना एका व्यक्तीला जवळील घरात नेऊन त्याची चाकूने भोकसून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह जवळील नाल्यात फेकून देण्यात आला, असे पोलिसांना सांगितल्याचे अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.