अमरावती - न्यायाधीशांबाबत सोशल मीडियावर टिप्पणी केल्याबद्दल आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ४९ जणांना नोटीस बजावली आहे. यामध्ये 'वायएसआरसीपी'चे बापाटलामधील खासदार एन सुरेश, आणि चिरालाचे माजी आमदार ए. कृष्णमोहन यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
लक्ष्मी नारायण या वकीलांनी दिलेल्या एका पत्रामध्ये या टिप्पण्यांचा उल्लेख होता. त्यानंतर न्यायालयाने या नेत्यांच्या आणि इतर लोकांच्या सोशल मीडिया पोस्ट्स पाहिल्या. यानंतर न्यायालयाने संबंधित व्यक्तींना नोटीस बजावली आहे.
माध्यमांशी बोलताना लक्ष्मीनारायण यांनी सांगितले, की या पोस्ट्स आक्षेपार्ह्य होत्या आणि पोस्टकर्त्यांना त्याचे भानही होते. राजकारणासाठी न्यायाधीशांचाही अशा प्रकारे वापर करुन घेणे हे धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशा पोस्ट करण्यामध्ये आमदार-खासदार यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या पोस्ट डॉ. के. सुधाकर राव यांच्या खटल्याशी निगडीत होत्या. या खटल्यातील न्यायालयाने दिलेला निर्णय हा निःपक्षपाती होता. त्यामुळे न्यायाधीशांबाबत अशा आक्षेपार्ह पोस्ट करणे निंदास्पद असल्याचे लक्ष्मीनारायण यांनी म्हटले आहे.
बार काऊन्सिलचे चेअरमन रामा राव हे याबाबत बोलताना म्हटले, की याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात न्यायालयाचा अवमान केल्यासंबंधात कारवाई होणार आहे.