नवी दिल्ली - लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा आज पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत विरोधकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या २४ तासात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. तसेच माकपचे सिताराम येचुरी यांचीही नायडू यांनी भेच घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चंद्राबाबू नायडू हे आज रात्री युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. शनिवारी चंद्राबाबू नायडू यांनी बसपच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, की अजूनपर्यंत विरोधकांची रणनीती ठरली नाही. निकालाअगोदर विरोधकांची कोणती बैठक होणार नाही. विरोधी पक्षातील सर्व नेते सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर चंद्राबाबू नायडू सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा पवार केंद्रस्थानी आल्याची चर्चा दिल्लीत सुरु आहे.
सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न
चंद्राबाबू नायडू यांनी सर्वच विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर पुढची रणणिती काय असणार यासंबधी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.