एखाद्या जंगलातील वणव्याप्रमाणे कोरोना विषाणूचा अत्यंत धोकादायक रीतीने जगभरात प्रसार होत आहे. या विषाणूचा चीनमधील केंद्रबिंदू असलेल्या हुबेई प्रांतातील मृतांचा आकडा 500 च्या घरात पोहोचला आहे. एकट्या चीनमध्ये किमान 26,000 लोक या विषाणूच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. भारतासह जगभरातील एकूण 26 देशांनी कोरोना विषाणूच्या रोगाची प्रकरणे आढळून आल्याची पुष्टी केली आहे.
फिलीपाईन्स आणि हाँगकाँग येथेही या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप या रोगास जागतिक आरोग्य आणीबाणी ठरवलेले नाही, परिणामी या विषाणूच्या विध्वंसक क्षमतेमुळे कोणताही देश स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगू शकत नाही. साप आणि वटवाघूळांद्वारे हा विषाणू मनुष्यामध्ये संक्रमित झाल्याचा अंदाज आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात सरकार अतिशय गंभीर आव्हानांचा सामना करीत आहे, अशी कबुली चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली आहे.
चीनने युद्धपातळीवर दहा हजार बेड्स असलेले रुग्णालय उभारले असून 13 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. सुमारे 4 कोटी नागरिकांच्या हालचालींचे निरीक्षण व नियंत्रण करत या विषाणूशी लढा दिला जात आहे. भारताने वुहानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची हवाई मार्गाने सुटका केली आहे, तर पाकिस्तानने चीनमध्ये अडकलेल्या नागरिकांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. सर्व देशांनी एकत्रित येऊन काम केले तरच हा विषाणू थोपवता येणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या या सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील आणीबाणीवर तोडगा काढण्यासाठी सर्व देश तयार आहेत का? हा प्रश्न आहे. कोरोना विषाणूमुळे सार्स (सिव्हीअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) महामारीची आठवण होते. अठरा वर्षांपुर्वी घडलेल्या या महामारीमुळे चीन संपुर्णपणे हादरला होता. देशाच्या व्यापारी हितसंबंधांना धोका निर्माण झाला होता. त्यावेळी उद्भवलेल्या महामारीचे कशाप्रकारे नियंत्रण करण्यात येत आहे, यासंदर्भात चीनकडून गुप्तता पाळण्यात आली होती. सध्या प्रादुर्भाव झालेल्या कोरोना विषाणूचे मूळ कारण हे जैविक शस्त्रांसंदर्भात फसलेले संशोधन आहे, अशा काही कॉन्स्पिरसी थिअरीज् आहेत.
या समस्येचे मूळ कारण कधी प्रकाशझोतात येईल की नाही याबाबत शंका आहे. कॅनडा, सिंगापूर आणि व्हिएतनाम सार्सचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरले. कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीन अथक प्रयत्न करीत आहे. त्यावेळी एकूण 8,000 लोकांना सार्सची लागण झाली होती, त्यापैकी 800 लोक मृत्यूमुखी पडले होते. 2009 साली एकूण 2.5 लाख लोकांना स्वाईन फ्लुची लागण झाली होती व यामुळे 3000 लोक मरण पावले होते. 2014 साली इबोला विषाणूमुळे तब्बल 7,000 लोक मृत्यूमुखी पडले होते.
झपाट्याने पसरत जाणाऱ्या कोरोना विषाणुमुळे, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. मिरच्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ गुंटुर मार्केट यार्डला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. कारण येथून चीनला होणारी मिरच्यांची निर्यात घसरली आहे. सूरतमधील हिऱ्यांच्या व्यापारापासून इतर काही क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. जेव्हा 2002 साली सार्सचा प्रादुर्भाव झाला होता, चीन जागतिक व्यापार संघटनेचा नवा सदस्य होता. आज ज्या देशांबरोबर चीनचा व्यापार सुरु आहे, त्या प्रत्येक देशाला नुकसान सोसावे लागत आहे. दुसरीकडे, मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सार्वजनिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी चीन आपली सगळी यंत्रणा आणि स्त्रोत एकत्र करीत आहे, परिस्थिती नियंत्रणापलीकडे गेली आहे. फिलीपाईन्स आणि हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याने तेथील व्यावसायिक पर्यटनावर परिणाम झाला आहे. तेथील देशांतर्गत पर्यटनदेखील सर्वाधिक नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. भारत सरकारने इतर सर्व राज्यांना केरळचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला आहे. तेलंगण सरकारने कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण खासगी रुग्णालयांमधून सरकारी रुग्णालयात हलविण्याचा आदेश दिला आहे.
संशयित रुग्णांवर गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सेवांच्या गुणवत्तेवर आधारित 195 देशांच्या क्रमवारीत भारत 145 व्या स्थानावर आहे. वैद्यकीय सेवा मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे वर्षाला 24 लाख बळी जातात. राज्यांना पुरेशी काळजी घेण्याचा इशारा जारी करुन केंद्र सरकारची जबाबदारी संपत नाही. ज्या देशात मोठ्या प्रमाणावर सोहळे आणि मिरवणूका आयोजित केल्या जातात, अशा ठिकाणी असे साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक जागरुकता आणि वैद्यकीय सेवा महत्त्वाच्या आहेत.
देशाच्या कोणत्याही भागात या विषाणूची लागण झालेले संशयित रुग्ण आढळून आल्यास, त्यांची काळजी घेताना अत्यंत खबरदारी बाळगण्यात यायला हवी. केंद्र आणि राज्य सरकारने वेळेत पावले उचलली नाहीत तर, चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला, भारतात आटोक्यात आणणे कठीण जाणार आहे!