नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील नेते सईद अल्ताफ बुखारी यांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. बैठकीनंतर बुखारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील इतर नेत्यांची लवकरच सुटका करण्यात येणार असल्याचे बुखारींनी सांगितले.
बुखारी म्हणाले की, या बैठकीत जम्मू-काश्मीरशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच राजकीय नेत्यांच्या बंदीवर गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. लवकरच नेत्यांची सुटका करण्यात येईल, असे आश्वासन शाह यांनी दिले आहे. या बैठकीत गृह सचिव ए.के. भल्ला यांच्यसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जम्मू आणि काश्मीरमधील नेते सईद अल्ताफ बुखारी यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. 'अपनी पार्टी' असे नव्या पक्षाचे नाव ठेवले आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या राजकीय पक्षाचे ते माजी मंत्री होते. हा पक्ष खोऱ्यातील सामान्य लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे नाव अपनी पार्टी असे ठेवले असल्याचे बुखारी यांनी सांगितले. अपनी पार्टीमध्ये डेमोक्रेटिक पार्टी नॅशनलिस्ट पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री गुलाम हसन मीर यांच्यासह इतर नेत्यांनी प्रवेश केला आहे.