श्रीनगर (जम्मू काश्मीर)- चीनबरोबर पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती असताना भारतीय हवाई दलाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये आपत्कालीन हवाई धावपट्टीचे काम सुरू करण्यात आले आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरा या परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 आहे. येथून जवळच तीन किलोमीटरच्या हवाई धावपट्टीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या धावपट्टीचा उपयोग लढाऊ विमानांना आपत्कालीन स्थितीत करता येणार आहे.
हे काम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ट्रक आणि कामगारांना पास दिले आहेत.
चीनचे सैन्यदल आणि भारताचे सैन्यदल प्रत्यक्ष ताबा रेषेवर आमनेसामने उभे ठाकले आहेत. अशा स्थितीत या धावपट्टीच्या कामाला विशेष महत्त्व आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीन आणि भारत यांच्यात स्थिती आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमधील सैन्यदल व सरकारी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत आहेत.