पटियाला - जिल्ह्यातील एक तरुण आपल्या स्वप्नातील मुलीसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी दुचाकीवरुन पटियालाच्या कल्याण भागात पोहोचला. चंदप्रीतसोबत युवराजने याठिकाणी जाऊन लग्नगाठ बांधली. यानंतर त्याने दुचाकीवरुनच रविवारी नववधूला आपल्या घरी नेले.
दुचाकीवरुन जात असताना रस्त्यात पोलिसांनी या जोडप्याचे स्वागत केले. या नवविवाहितांना सॅनिटायझर आणि मास्कही दिले. इतकेच नव्हे तर त्यांना मिठाई आणि फुलांचा गुच्छही दिला. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे पालन करत पार पडलेल्या या विवाहाचे पोलिसांनी कौतुक केले.
याबद्दल बोलताना नवरदेव युवराज म्हणाला, लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांची बचत. केवळ कुटुंबातील व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होतो. शिवाय यामुळे पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे आमचे स्वागत केले आणि त्यांनी आम्हाला उत्तम वागणूकही दिली, असेही युवराज पुढे म्हणाला.
तर, या लग्नसोहळ्यबाबत आणि दुचाकीवरुन सासरी जाण्याच्या अनुभवाबाबत चंदप्रीतनेही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ही खूप अनोखी भावना आहे. आमच्या लग्नाबाबत सर्वात खास गोष्ट म्हणजे ते लॉकडाऊनमध्ये झाले. शिवाय आम्हाला पोलिसांकडून मिठाई आणि फुलेही मिळाली. त्यामुळे, आम्ही खूप आनंदी असल्याचे तिने म्हटले.