नवी दिल्ली - भारत-चीन सीमावाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तरेकडील सीमेवर प्रामुख्याने लडाख सेक्टरमध्ये नौदलाचे पी-8 आय ही निगराणी विमाने प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यातच आता सीमेवर नौदलाकडील मिग-29 के हे लढाऊ विमानेही तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे चीनच्या आक्रमक धोरणाला उत्तर देण्यासाठी भारताची क्षमता आणखीनच वाढणार आहे.
तिन्ही सैन्य दलांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आता नौदलाची लढाऊ विमाने पश्चिम आणि उत्तर सीमेवरील हवाई दलाच्या तळांवर तैनात करण्यात येणार आहेत. सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनीही यासंबंधी सुचना दिल्या होत्या.
नौदलाची मिग 29- के विमाने उत्तर सीमेवर तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पूर्व लडाख सीमेवर निगराणी ठेवण्यासाठी त्यांना तैनात केले जाणार आहे, असे सरकारी सुत्रांनी सांगितले. नौदलाकडे मिग 29- के या 40 विमानांचा ताफा आहे. सध्या आयएनएस विक्रमादित्यवर त्यांना तैनात करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील हंस या नौदलाच्या तळावरून ही विमाने उड्डाने घेतात.
नौदलाच्या विमानांनी चीनबरोबरच्या डोकलाम वादावेळीही सीमेची निगराणी केली होती. हिंदी महासागरात मलाक्का सामुद्रधुनी भागातून चिनी लष्कर हिंदी महासागरात येऊ शकते, त्या भागात नौदलाकडून कवायती करण्यात येतात. आण्विक पाणबुडी आयएनएस चक्र आणि आयएनएस अरिहंत या देखील समुद्रात टेहाळणी करत आहेत. विमानवाहू नौका आयएनएस विक्रामादित्य देखील समुद्रात तैनात करण्यात आली आहे. चिनी आक्रमणाला रोखण्यासाठी भारतीय लष्कर जमीन, हवा आणि समुद्र तिन्ही ठिकाणी सतर्क आहे.