लखनऊ - राज्यातील अमेठी जिल्हा पोलिसांनी अवैधरित्या तस्करीसाठी चालवलेल्या ५०२ कासवांची सुटका केली आहे. सर्व कासवांना एका वाहनातून पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात विक्रीसाठी नेण्यात येत होते. या कासवांची किंमत ६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तस्करी प्रकरणी पोलिसांनी रमेश नामक एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. मित्रांबरोबर मिळून गावाजवळील तलाव, नदी आणि विहरीतून कासवांना पकडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. कोलकात्यात काळ्या बाजारात कासवांना चांगली किंमत मिळेल म्हणून त्यांना पश्चिम बंगालमध्ये घेवून चालल्याचे आरोपीने सांगितले.
माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक दिनेश सिंह म्हणाले, गुप्त माहितीच्या आधारे रमेश नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरिक्षक राजेश कुमार सिंह यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. तस्करांवर वन्यप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी रमेश हा अमेठी जिल्ह्यातील गांधीनगर येथील आहे. त्याचा साथीदार विशाल हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.