चंदीगढ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. २६ जानेवारीपर्यंत आपल्या मागण्या मान्य नाहीत केल्या, तर दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. या मोर्चासाठी सध्या देशभरातून लाखो शेतकरी सिंघू सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. सध्या याठिकाणी सुमारे ५० हजारांहून अधिक शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसोबत उभे असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली पोलिसांची मंजूरी..
दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर रॅलीला मंजूरी दिली आहे. त्यांनी शेतकरी संघटनांकडे या मोर्चासाठी एक रोडमॅप दिला आहे. पोलिसांनी सुचवलेल्या मार्गावरुनच शेतकऱ्यांनी आपला ट्रॅक्टर मोर्चा न्यायचा आहे.
मोर्चा शांततेत पार पडणार..
सिंघू सीमेवर उपस्थित शेतकऱ्यांसोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला. यावेळी हे शेतकरी म्हणाले, की आम्ही शांतीपूर्ण मार्गानेच ही परेड नेणार आहोत. केवळ किती प्रमाणात लोकांचा या कायद्यांना विरोध आहे, हेच आम्हाला सरकारला दाखवून द्यायचे आहे. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत.
हेही वाचा : शेतकरी आंदोलन : टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचा मृत्यू