नवी दिल्ली- सचिन पायलट यांच्या घरवापसीनंतर राजस्थानचा सत्ता संघर्षाचा अध्याय समाप्त झाला असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. सर्व काही ठीकच होते, त्यामुळे या अध्यायाच्या शेवट आनंदी झाला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
गेल्या 30 दिवसांमध्ये राजस्थानमध्ये कशाप्रकारे सत्ता संघर्ष सुरू होता आणि कसा मिटला हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. हा राजस्थानची 8 कोटी जनता, आमचे आमदार आणि हितचिंतक याचा विजय असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ते मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या विजयाचे सर्व श्रेय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना जाते. राहुल गांधी यांची दूरदृष्टी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा जो संकल्प आहे, तसेच यासाठी प्रियांका गांधी यांचे जे सहकार्य लाभत आहे, त्यामुळे हा विजय शक्य झाला, तसेच अशोक गहलोत यांची परिपक्वता आणि सचिन पायलेट यांचा पक्षावरील विश्वास आणि निष्ठेमुळे या सत्तासंघरातून तोडगा निघाला असल्याचेही सुरजेवाला म्हणाले.
सचिन पायलट यांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. त्या भेटीत तीन सदस्यीय समिती नेमून पायलट यांच्या तक्रारी बाबत तोडगा काढण्याचे आश्वासन गांधींनी दिले. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर सोमवारी पडदा पडला.
पायलट आणि गेहलोत यांच्यातील कुरघोडीबाबत विचारणा केली असता सुरजेवाला म्हणाले, हो निश्चितच त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. दोघांमध्ये नाराजी होती. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत पायलट यांनी त्यांच्या आमदारांसह राजस्थान सरकारसोबत काम करण्याचे मान्य केले आहे आणि आता या सत्ता संघर्षाचा अध्याय समाप्त झाला आहे.
सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपवरही यावेळी सुरजेवाला यांनी निशाण साधला, जनतेने नाकारलेल्या भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. हे तेच लोक आहेत जे वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहेत. त्यांना त्यांच्या आमदारांची बैठक बोलवता आली नाही अन् शेवटी त्यांना घेऊन जाण्यासाठी 3 विशेष विमानाची व्यवस्था करावी लागली असल्याचेही सुरजेवाला म्हणाले.