नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढत आहे. याचे खंडन करताना पक्षाचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे, की पक्षात कोणतीही भांडणे झाली नाहीत किंवा कोणते संकट आले नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कल्पनेच्या जोरावर माध्यमांनी रचलेल्या बातम्या आहेत. माध्यमांना वगळता पक्षात कोणतीही भांडणे नाहीत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळवता आला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर, पक्षात राजीनामा सत्र सुरू झाले. खुद्द राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला.
आज (मंगळवार) प्रियंका गांधी वाड्रा, अशोक गेहलोत, सचिन पायलट, रणदीप सुरजेवाला, के.सी वेणुगोपाल, प्रमोद तिवारी यांनी राहुल गांधी यांची भेट घेत घेतली. नवीन व्यक्तीला अध्यक्षपदावर बसवणे सध्या योग्य नाही. पराभवाची जबाबदारी सर्वांची असून वैयक्तीक नाही. राहुल गांधींना राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे, असा निर्णय घेण्यात आला.