कोलकाता - बांगलादेशहून जे नागरिक भारतात आले आणि त्यांपैकी निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केले ते सर्व भारतीय नागरिकच आहेत. त्यांना आता नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची गरज नाही, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
"बांगलादेशमधून जे नागरिक भारतात आले आहेत, ते भारतीयच आहेत, त्यांना नागरिकत्व मिळाले आहे. त्यामुळे त्या नागरिकांना पुन्हा नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही (बांगलादेशी नागरिक) आतापर्यंत निवडणुकांमध्ये आपले मत देत आले आहात, त्यातूनच तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना निवडून दिले आहे. आता ते (पंतप्रधान) म्हणत आहेत, की तुम्ही देशाचे नागरिक नाही. त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका", असे ममता म्हणाल्या. यासोबतच, आपण बंगालमधून एकाही माणसाला बाहेर काढू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, राज्यात राहत असलेला एकही निर्वासित नागरिकत्वापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यासोबतच दिल्लीतील हिंसाचारावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, की दिल्लीमध्ये जे झाले ते आपण बंगालमध्ये होऊ देणार नाही. आम्हाला बंगालची दुसरी दिल्ली, किंवा दुसरा उत्तर प्रदेश झालेला नको आहे.
हेही वाचा : दिल्ली हिंसाचार : मृतांची संख्या ४८ वर, जीटीबी रुग्णालयातील आकिबने घेतला अखेरचा श्वास..