अजमेर - फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामबाबत टिप्पणी केली होती. या विरोधात आज शहरातील मुस्लिमांनी निषेध व्यक्त केला आहे. जगाने मॅक्रॉन यांचा विरोध करावा, अशी मागणी मुस्लिमांनी केली आहे.
काझी मौलाना तौसिफ अहमद सिद्दिकी यांच्या नेतृत्वात मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवण्यात आले आहे. यात इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात जगभरात आंदोलन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मॅक्रॉन यांच्या हजरत मोहम्मद साहेबांविरुद्ध केलेल्या वक्तव्याचे मी आणि सर्व मुस्लीम बांधव निषेध करतो. त्यांच्याविरोधात आम्ही शांतीपूर्वक आंदोलन करणार आहे. याप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवावा, जेणे करून भविष्यात कोणीही अशी आक्षेपार्ह टीका करणार नाही, अशी मागणी सिद्दिकी यांनी केली.
हेही वाचा- 'लालू यादव आणि नितिश कुमार यांच्यापासून बिहारमुक्त झाल्यासच, विकास होणार'
तसेच, जगप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यातून जगाला शांती आणि बंधुत्वाचा संदेश जातो. विविध देशातील नागरिक शातता नांदावी, यासाठी दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी येतात. अशावेळी फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे हजरत मोहम्मद यांच्याविरुद्धचे विधान हे निषेधार्ह आहे, अशी टीका देखील सिद्दिकी यांनी केली.
काय आहे प्रकरण ?
विद्यार्थ्यांना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची व्यंगचित्रे दाखवून त्या विषयावर चर्चा घडवल्यामुळे पॅरिसमध्ये एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय चेनेन या संशयित आरोपीस गोळ्या झाडून ठार केले होते. यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद असे सांगत ‘इस्लाम आपले भविष्य हिरावून घेण्याच्या विचारात आहे, मात्र हे कधीच होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.
यानंतर इस्लामिक देश आणि फ्रान्स यांच्यामधील वाद वाढत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. नंतर मॅक्रॉन यांनी मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रांवर बंदी घालण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. तरीही त्यांचा विरोध काही मुस्लीम संघटनांनी करणे थांबवलेले नाही.
हेही वाचा- राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात दोन गावांमध्ये 'एनआयए'ची छापेमारी