नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने सर्वात मोठे 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत विविध देशांमध्ये ६४ विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत. आजपासून(गुरुवार) हे मिशन सुरू होत आहे. दिल्ली ते सिंगापूर अशी फ्लाईट आज रात्रीपासून सुरू होत आहे.
गृहमंत्रालयाने 'स्टंडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल' काल सायंकाळी जारी केली, त्यामुळे विमान सेवा सुरू करण्यास उशीर झाल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ७ मे ते १३ मे दरम्यान एअर इंडिया ६४ विमानांद्वारे १२ देशांमध्ये अडकलेल्या सुमारे १५ हजार भारतीयांना माघारी आणणार आहे. यामध्ये इंग्लड, अमेरिका, युएई या देशांचा समावेश आहे.
वंदे भारत मिशनमध्ये असलेल्या एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांची आधी कोरोना चाचणी होणार आहे. जर त्यातील एखाद्याला लागण झाली तर त्याला मिशनपासून दूर केले जाणार आहे. ज्यांची चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांनाच मिशनमध्ये सहभागी करून घेतले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
या मिशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये १४ हजार ८०० नागरिकांना भारतात आणले जाणार आहे. ७ मे पासून हे मिशन सुरू होणार आहे, असे नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. सर्व प्रवाशांकडून एका बाजूच्या प्रवाशाचे भाडे घेण्यात येणार आहे.