नवी दिल्ली - स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर चार विमान कंपन्यांकडून प्रवासबंदी घालण्यात आली आहे. विमान कंपनी इंडिगोनं त्याच्यावर सहा महिन्यांची तर एअर इंडियानं त्याच्या विमान प्रवासावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. कुणाल कामरावर केलेल्या या कारवाईचा एका दुसऱ्याच कुणाल कामराला फटका बसला आहे. नाव समान असल्यामुळे गोंधळ झाला आणि एअर इंडियानं दुसऱ्या एका कुणाल कामराचेच तिकीट रद्द केले.
नाव सारखे असलेला दुसरा कुणाल कामरा हा अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहतो. तो आपल्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर जयपूरवरून मुंबईला जाण्यासाठी ते विमानतळावर पोहचले. मात्र, यावेळी त्यांचे तिकीट रद्द करण्यात आल्याचे त्याला सांगण्यात आले. कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर हा कुणाल कामरा दुसराचं असल्याचे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. बराच वेळ वाद घाल्यानंतर अखेर त्याला विमातळावर प्रवेश मिळाला.
काय आहे प्रकरण?
रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी हे इंडिगो विमानाने प्रवास करत असताना, कुणाल कामराने त्यांच्यासोबत जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवत, कामराने त्यांना काही प्रश्नही विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे अर्णब यांनी दिली नाहीत, त्यानंतर कामराने त्यांना "भित्रा पत्रकार" म्हटले होते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्याने ट्विटरवर अपलोड केला होता. विमान कंपन्यांनी यावर आक्षेप घेत कुणाल कामरावर प्रवास बंदी घातली आहे.