हैदराबाद - कोरोनामुळे अनेक भारतीय नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटक बाहेरच्या देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना परत देशात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत' मोहीम सुरू केली आहे. वंदे भारत मोहिमेच्या दुसऱया टप्प्यात 175 भारतीय नागरिकांना बहरीनहून येथून मंगळवारी परत आणले आहे.
बहरीन येथून 175 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे IX 890 विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. सर्व प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रवाशांना क्वारंटाईन कालावधीत कोरोनाची कोणती लक्षणे आढळून येतात का? यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर गरज पडल्यास उपचार केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात रुग्ण आढळून आल्याने 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक भारताबाहेर अडकले होते. अशा नागरिकाना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत विमानाच्या माध्यमातून भारताबाहेरील नागरिकांना भारतात आणले जात आहे.