वाराणसी - पंतप्रधानांचे कार्यालय विकायला असल्याची ओएलएक्सवरील जाहिरातीची सध्या उत्तर प्रदेशात सगळीकडे चर्चा सुरू आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. मात्र, काही समाजकंटकांनी हे कार्यालय विक्रीला असल्याची जाहिरात ओएलएक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री साईटवर टाकली होती.
विक्री किंमत साडेसात कोटी
वाराणसीतील जवाहरनगर येथे पंतप्रधान मोदींचे जनसंपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय विकायचे असल्याची जाहिरात काही व्यक्तींनी ओएलएक्स साईटवर टाकली. विशेष म्हणजे या कार्यालयाची किंमत साडेसात कोटी ठेवण्यात आली होती. तसेच कार्यालयाचे चार फोटोही अपलोड करण्यात आले होते. कार्यालय विकणाऱ्याचे नाव लक्ष्मीकांत ओझा असे खोटे नाव देण्यात आले होते.
चार जणांना अटक, गुन्हा दाखल
ओएलएक्सवर कार्यालयाचा पत्ता मात्र, चुकीचा देण्यात आला आहे. या जाहिरातीत कार्यालयाच्या खोल्या, तेथील सुविधा आणि बांधकासंबंधीची माहितीसह पार्किंग सुविधेचीही माहिती जाहिरातीत दिली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू केला. याप्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ही जाहिरात ओएलएक्सच्या वेबसाईटवरून काढून टाकली आहे.