श्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले आहे. तसेच ३८ जवान जखमी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतली आहे. या हल्ल्यात 'सुसाईड बॉम्बर' म्हणून सहभागी झालेल्या दहशतवादी आदिल अहमद दार याचे घर घटनास्थळापासून फक्त ५ किमी अंतरावर आहे. दरम्यान, या ठिकाणावरुन श्रीनगर १७ किमी अंतरावर आहे.
आदिल अहमद हा २२ वर्षीय तरुण असून त्याने २ वर्षांपूर्वी शिक्षण सोडले होते. तो दक्षिण काश्मीरमधील गुंडिबाग गावात राहत होता. हल्ला करण्याआधी जैश-ए-मोहम्मद संघटनेने त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला होता. आदिल दर याने हल्ल्यापूर्वी काही वेळ आधीच हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो म्हणतो, या हल्ल्यासाठी मागील १ वर्षापासून तयारी सुरू होती. यामध्ये तो काश्मीरी मुस्लिमांच्या प्रश्नांबद्दल बोलला आहे. या व्हिडिओमध्ये आदिलच्या हातात एक रायफल असून त्याच्या मागे जैश-ए-मोहम्मदचा बॅनर असल्याचे दिसत आहे.
दहशवादी आदिल याला "आदिल अहमद गाडी टकरानेवाला" आणि "गुंडिबागचा वकास कमांडो" म्हणूनही ओळखले जात होते. तो मागील वर्षी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याने गुरुवारी जम्मूवरुन श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. या जवानांच्या ताफ्यात २ हजार ५०० हून अधिक जवान होते. ते बसने श्रीनगरकडे जात होते. त्यावेळी आदिलने ३५० किलोग्रॅम स्फोटक असलेली गाडी ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा स्फोट एवढा भयानक होता की याचे हादरे आसपासच्या १० किमीपर्यंत बसले.