बंगळुरू - गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकर याला विशेष तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. याआधी विशेष तपास पथकाने १७ जणांना अटक केली आहे, आता याप्रकरणी १८ वी अटक करण्यात आली आहे. झारखंडमधील धनबाद येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
ऋषीकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४) याला झारखंडमधील धनबाद जवळील कटरास येथून गुरुवारी अटक करण्यात आली, अशी माहिती विषेश तपास पथकाचे अधिकारी एम. एन अनुचित यांनी सांगितले. देवडीकर कटासर येथे दुर्गम स्थळी ओळख लपवून राहत होता. ऋषिकेश, राजेश, मुरली, शिवा अशी खोटी नावे सांगून तो राहत होता.
अटक केल्यानंतर पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. आज (शुक्रवारी) त्याला जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी देवडीकर हा प्रमुख आरोपी होता, अशी माहिती पोलिासांनी दिली.
५ सप्टेंबर २०१७ ला बंगळुरूमधील राजेश्वरीनगर भागातील घरी गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. आत्तापर्यंत १८ जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. यातील दोन आरोपी फरार होते. विकास पाटील उर्फ निहाल आणि ऋषीकेश उर्फ मुरली अशी फरारी आरोपींची नावे होती. यातील १८ व्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संघटीत गुन्हेगारांनी ही हत्या घडवून आणल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. अमोल काळे या टोळीचा प्रमुख असून विकास पाटील आणि अमोल देवडीकर मुख्य सदस्य होते.
कोण होत्या गौरी लंकेश?
गौरी लंकेश कन्नडमधील ‘लंकेश पत्रिके’च्या साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. या वेगळ्या धाटणीच्या साप्ताहिकाची सुरुवात त्यांचे वडील पी. लंकेश यांनी १९८० मध्ये केली होती. ‘लंकेश पत्रिका’ हे व्यावसायिक साप्ताहिक नव्हते. या वृत्तपत्रातून त्या विवेकवादी विचार मांडत. दलित, महिला, सामाजिक प्रश्न या साप्ताहिकातून मांडण्यात येतात. त्याला काही कट्टर विचारवादी संघटनांचा विरोध होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.