नवी दिल्ली - ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीप पडताळून पाहण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. याचा निषेध करत काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी आजचा दिवस हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्ष नाराज आहेत. आयोग हा मोदींसाठी एक तर इतरांसाठी दुसरा न्याय देत आहे. आयोगाचा निर्णय हा दुर्दैवी असून भाजपच्या बाजूने हा निकाल देण्यात आला आहे. आयोग आमची एवढी छोटी मागणी मान्य करत नसल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.
ईव्हीएमसोबत ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करण्याची मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस व अन्य २२ पक्षांच्या नेत्यांनी केली होती. या मागणीवर विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज बैठक घेतली. या बैठकीस निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते. विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतमोजणीस दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने आयोगाने ही मागणी फेटाळली.
निवडणूक आचारसंहिता आता मोदी प्रचार संहिता झाली आहे का? ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत काहीच केले जात नाही. ईव्हीएमला ईलेक्ट्रॉनिक विक्टरी मशीन बनवायचे आहे का? असा सवालही सिंघवी यांनी उपस्थित केला.