जयपूर - राजस्थानातील प्रतापगड जिल्हा कारागृहात तब्बल 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील तुरुंगच कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. प्रतापडगमध्ये सुरुवातीला कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. मात्र, उपचारानंतर सर्वजण बरे झाले होते. जिल्हा कोरोना मुक्त झाला असतानाच आता पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे.
एकमेकांच्या संपर्कात आल्याने जिल्हा कारागृहातील 28 कैदी कोरोनाबाधित सापडले आहेत. आज एकाच दिवसात 26 रुग्ण आढळून आले. गोळीबाराच्या प्रकरणात तुरुंगात आलेला एक कैदी सर्वात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यानंतर आणखी एक कैदी कोरोना बाधित आढळला. मात्र, आता एकूण बाधितांची संख्या 28 झाली आहे.
कारागृहात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन आता प्रत्येक कैद्यांची थर्मल चाचणी करत आहे. तसेच कैद्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीप्रमाणे कैद्यांची चाचणी करण्यात येईल, असे कारागृह अधीक्षक कुमार शर्मा यांनी सांगितले. राज्यातील ढोलपूर जिल्ह्यातील तुरुंगात देखील 20 कोरोना बाधित आढळून आले होते.