नवी दिल्ली - हैदराबाद आणि उन्नाव येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच बिहारमध्ये ५ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी आरोपीने तिच्याजवळ कोणीच नसल्याचे पाहिले. संधी साधून आरोपीने तिला टॅम्पोमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला जवळील एका उद्यानामध्ये सोडून दिले. ही घटना सदार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे.
कुटुंबीयाना मुलगी घराबाहेर खेळताना न दिसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. 5 तासानंतर त्यांना मुलगी दयनीय अवस्थेमध्ये सापडली. तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होताना दिसला. कुटुंबीयांनी तीला रुग्णालयात दाखल केले असून तीच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तेत्तार सहानी असे त्याचे नाव आहे.
हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करून जाळण्यात आले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र, या घटनेनंतर केवळ आठवड्याभरातच देशभरात अशा प्रकारच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. ही बाब धक्कादायक आहे.