नवी दिल्ली - रामलीला मैदानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात 'नागरिकता' असा उल्लेख केला. मात्र, ही नागरिकता कायद्याशी संबंधित नसून हे एका चिमुकलीचे नाव आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. मात्र दुसरीकडे, मजनू का टिला भागात राहणाऱ्या एका निर्वासित हिंदू कुटुंबाने नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आपल्या घरी जन्मलेल्या मुलीचे नाव 'नागरिकता', ठेवून आनंद व्यक्त केला. याच 'नागरिकता'चा उल्लेख थेट पंतप्रधानानी काल(23डिसेंबर) आपल्या भाषणात केला होता.
गेली अनेक वर्ष निर्वासितांचे आयुष्य जगत असताना आता कुठे भारताचे नागरिक अशी ओळख मिळेल, याचा आनंद आणि गर्व असल्याचे नागरिकताची आई आरती सांगतात. याशिवाय, भारताचे नागरिकत्व मिळणे म्हणजे हक्काच्या सर्व सुविधा मिळण्यासारखे आहे, अशी भावना नागरिकताच्या आजीने व्यक्त केली आहे. यावेळी, त्यांनी या कायद्यावर राजकारण न करण्याचे आवाहनदेखील नागरिकांना केले आहे.
हेही वाचा - सीएए कायदा मुस्लिमच नाही तर सर्व देशवासियांच्या चिंतेचा विषय - ओवेसी
दिल्लीच्या मजनू का टिला भागात 2013मध्ये निर्वासितांचे एक शिबीर पार पडले होते. इथे सद्यस्थितीला पाकीस्तानातील 130 निर्वासित हिंदू कुटुंब राहतात.