उत्तर प्रदेश - हापूर येथील चामरी येथील रहिवाशाला चक्क १२८ कोटी ४५ लाख ९५ हजार ४४४ रुपयाचे वीज देयक आले आहे. शमिम असे वीज ग्राहकाचे नाव आहे. वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शमिम यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वीज वितरणाने पाठवलेल्या विज देयकातील भरमसाठ बिल पाहून शमिम यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत त्यांनी वीज वितरण विभागात तक्रार केली. मात्र, विभागाने त्यांना संपूर्ण वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीतच ठेवणार असल्याचे सांगितले. यावर वीज वितरण कंपनी संपूर्ण हापूरचे बिल माझ्याकडून घेत आहे का? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला आहे. याबाबत बोलताना शमिम यांची पत्नी खैरू निशा यांनी प्रशासना विरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला. आम्ही फक्त पंखा आणि बल्ब वापरतो. मात्र, तरीही एवढे बिल कसे येऊ शकते, असा प्रश्न त्यांनी वीज वितरण विभागाला केला आहे.
दरम्यान, वीज वितरण विभागाचे सहायक वीज अभियंता राम शरण यांनी तांत्रिक अडचणींमुळे वीज देयक वाढले असल्याचे कबूल केले आहे. संबंधित ग्राहकाने वीज बिल परत केल्यास चुका शोधून व त्यात बदल करुन त्यांना नवे बिल देता येत असल्याचे त्यांनी सांगितले.