नवी दिल्ली - देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, लग्न ठरलेल्याची पंचायत झाली असून मोजक्या नातेवाईकांसह विवाह इच्छुक युवक-युवती लग्न करताना दिसून येत आहे. त्यातूनही कोरोनाचा संसर्ग होताना दिसून येत आहे. मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये एका नवविवाहितेचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे नवऱ्यासह 35 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
सतलापूर येथील मुलाशी 18 मेला लग्न झाले होते. लग्नाच्याआधीपासूनच ती आजारी होती. कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिची चाचणी करण्यात आली. मंगळवारी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नवरीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे लग्नामधील उपस्थितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान देशभर पसरलेल्या कोरोना संकटावर सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक लग्ने लागली आहेत.
मध्य प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत 1 हजार 391 आरोग्य तपासणी केंद्र करण्यात आले असून आतापर्यंत 42 हजारांहून अधिक संशयितांची आरोग्य चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी 30 हजार 555 संशयितांना सेल्फ ओयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 6 हजार 50 संशयितांच्या कोरोना चाचणीचे नमुने घेण्यात आले आहेत. चाचणी केलेल्या लोकांपैकी 2 हजार 959 रुग्णांना कोरोनावर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.