तुमकूरु - कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. आज कर्नाटकमधील तुमकूरु येथे कोरोनाबाधित ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 5 मार्चला ते रेल्वेने दिल्लीला गेले होते आणि ११ मार्चला परत आले होते. रेल्वेमध्ये त्यांच्यासोबत प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे.
कर्नाटकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५ असून आतापर्यंत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातशेच्या घरात पोहोचली आहे. देशात कोरोनाचे ७२४ रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला ६७७ भारतीय नागरिक तर ४७ विदेशी नागिरक असे एकूण ७२४ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एकूण ४५ जण या आजारातून बरे झाले असून यामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनग्रस्तांवर उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाच्या विनंतीनंतर १७ राज्यांनी रुग्णालय बांधायला सुरुवात केली आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १७९ देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना विषाणूमुळे २१ हजार पेक्षाअधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.