सुरत- गुजरात राज्यात वास्तव्यास असणाऱ्या उत्तरेकडील राज्यातील 93 कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचा भंग आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक केली. ही घटना रविवारी घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील गणेश नगर आणि तिरुपती नगर येथे रविवारी रात्री उत्तरेकडील राज्यातील 500 पेक्षा जास्त कामगार रस्त्यांवर उतरले होते. त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी होती. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली, अशी माहिती पोलीस उपायुक्त विधी चौधरी यांनी दिली.
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगार सुरतमधील पंडेसरा भागात वास्तव्यास आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश मजूर कापड गिरण्या आणि लूम कंपनीमध्ये काम करतात. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यापैकी काही जणांनी दगडफेक केली. दगडफेक झाल्यामुळे पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले,असे चौधरी यांनी सांगितले.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. पोलीस उपायुक्त विधी चौधरी यांच्या गाडीचेही यामध्ये नुकसान झाले आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना समाजकंटकांना रविवारी रात्री अटक करण्यात आली तर काही जणांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दंगल करणे आणि साथ रोग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी 500 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर 93 जणांना अटक करण्यात आली आहे.