नवी दिल्ली - काल (मंगळवार) प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. नियोजित मार्गावरून न जाता आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडत शहरातील विविध भागात प्रदर्शन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांच्या हल्ल्यात ३०० पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिल्ली आहे.
लाल किल्ल्यावर कब्जा -
काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा करत झेंडा फडकावला. आंदोलनादरम्यान सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, तरीही शांततेत सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. हिंसक झालेल्या आंदोलकांनी पोलीस गाड्यांचे आणि मालमत्तेचे नुकसान केले. अनेक ठिकाणी आंदोलकांनी वेगाने जमावात ट्रॅक्टरही घुसवले. एक ट्रॅक्टर पलटी होवून आंदोलकाचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी रॅलीचा मार्ग बदलून नियमभंग केल्याचे दिल्ली पोलिसांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर दुपारी अधिकृत वक्तव्य जारी केले.
दोन महिने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट -
आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा शेतकरी संघटना, आम आमदमी पक्ष, कॅप्टन अमरिंदर सिंग, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी आणि संघटनांनीही निषेध नोंदवला. दोन महिने शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला आजच्या घटनांमुळे गालबोट लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, सरकारने शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन कृषी कायदे मागे घ्यावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शांतता सुव्यवस्था राखणे सरकारचे काम -
शेतकरी जेव्हा शांततेत आंदोलन करत होते, तेव्हा केंद्र सरकारने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळेच आजच्या ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे सरकारचे काम होते, जे त्यांना जमले नाही. आज आंदोलनामध्ये जो हिंसाचार झाला, त्याचे कोणीही समर्थन करत नाही. मात्र, या हिंसाचारामागच्या कारणाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने समंजसपणे विचार करुन याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज व्यक्त केले.