नवी दिल्ली - कोरोनाच्या संकट काळातही उत्तर दिल्ली महापालिकेच्या शिक्षकांना पगार मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. गेले तीन महिने सुमारे 80 हजार शिक्षकांना पगार मिळालेला नाही. अखेर शिक्षक संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पगाराची मागणी केली आहे.
महानगरपालिका शिक्षक संघटनेचे महासचिव रामनिवास सोलंकी म्हणाले, की पगारासाठी न्यायालयालाही विनंती केली होती. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसाठी पत्र लिहिलेले आहे. कोरोनाच्या संकटात सर्व शिक्षक बारा तास काम करत आहेत. गरीबांना रेशन देणे आणि स्थलांतरित मजुरांनाही मदत, अशी कामे करीत आहेत. कोरोना उपचार केंद्रातही शिक्षकांकडून मदत करण्यात येत आहे.
शिक्षकांना मार्च-एप्रिल आणि मेमधील पगार मिळाला नसल्याचे अमित शाह यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आधीच गेले चार वर्षे सातव्या वेतन आयोगातील फरक मिळालेला नाही. गेले अनेक वर्षे वैद्यकीय बिले देखील मिळालेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये शिक्षक किंवा शिक्षिका यांना स्वतःसाठी किंवा कुटुंबातील व्यक्तीसाठी उपचार करण्याची वेळ आली, तर त्यांना उधारीवर पैसे घ्यावे लागतात.
पगार मिळत नसल्याने शिक्षक खूप निराश झाले आहेत, याकडे संघटनेने अमित शाह यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 18 जूनला उत्तर महापालिकेला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आदेश दिले होते. उत्तर दिल्ली महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे.