नवी दिल्ली : देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया प्रकरणाला आज आठ वर्षे पूर्ण झाली. यानंतर देशात एकूणच महिला अत्याचारविरोधी आंदोलनांची जी लाट आली होती, ती पाहता महिलांवरील अत्याचाराला आळा बसेल असे आशादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र, ही आशा फोल ठरल्याचे एका आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत यावर्षी सुमारे १५०० बलात्कारांची नोंद..
एका आकडेवारीनुसार, नवी दिल्लीमध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत १,४२९ बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०१९मध्येही एकूण २,१६८ बलात्कारांची नोंद करण्यात आली होती. २०१२मध्ये दिल्लीत एकूण ७०६ बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती.
महिलांवरील एकूण अत्याचारांमध्येच वाढ..
२०१२मध्ये महिलांवरील हल्ल्यांच्या ७२७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०१९मध्ये अशा प्रकारच्या २,९२१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यावर्षी ऑक्टोबरपर्यंतच अशा १,७९१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत २,२२६ महिलांचे अपहरण करण्यात आल्याची नोंद झाली आहे.
हुंडाबळींच्या संख्येत घट; मात्र प्रमाण चिंताजनक..
दिल्ली पोलिसांनी यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत एकूण ९४ हुंडाबळींची नोंद केली. २०१२मध्ये एकूण १३४ हुंडाबळींची नोंद करण्यात आली होती. तर, २०१९मध्ये १०३ हुंडाबळींची नोंद करण्यात आली होती.
हेही वाचा : देशासाठी आजचा दिवस दुःखद - निर्भयाची आई