भोपाळ - महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात मजूरांना रेल्वेने चिरडल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या मजूरांच्या ट्रकला मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसची जोरदार धडक झाल्याने ८ मजूरांचा मृत्यू झाला तर ५५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली.
सर्व मजूर लॉकडाऊन असल्याने आपल्या गावी चालले होते. ट्रकमधून गावी नेण्यासाठी प्रत्येक मजूराकडून ३ हजार रुपये चालकाने घेतले होते. घटनेची माहिती मिळता कैंट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशातली उन्नाव जिल्ह्यात चालले होते. तर बसमध्ये एकूण ६३ प्रवासी होते.