रांची - झारखंडमधील गढवा जिल्ह्यात वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गढवा जिल्ह्यातील लहरिया टोला गावात ही घटना घडली. मृतांमध्ये १५ ते २१ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
ही दहा मुले झाडाखाली बसून खेळत होती. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. झाडाखाली असल्याने तिथे मुलांना पाऊस लागत नव्हता. त्यामुळे ती मुले तिथेच बसून राहिली. यावेळी मोठ्या आवाजासह या झाडावर वीज कोसळली. ज्यामध्ये सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. चार मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र उपचार सुरू असताना त्यामधील दोघांचा मृत्यू झाला. बाकी दोन मुलांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
सदोहर भाई रौशन पटवा आणि राजू पटवा अशी जखमी मुलांची नावे आहेत. तर राजू चौधरी, सुनील चौधरी, संजय चौधरी, कृष्णा चौधरी, सोनू चौधरी, पवन चौधरी, अन्तु चौधरी आणि सोनू कुमार चौधरी ही मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावामध्ये शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांसह प्रशासनदेखील सुन्न झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली.
हेही वाचा : पंतप्रधानांच्या हस्ते रांचीत 'किसान मानधन योजने'चा शुभारंभ