लखनऊ - इराण, अफगाणिस्तान आणि इंग्लंडहून आलेल्या एकूण आठ विदेशी नागरिकांना उत्तर प्रदेशमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासोबतच त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीमधील तबलिघी जमातच्या कार्यक्रमाला या आठही जणांनी हजेरी लावली होती.
मध्य प्रदेशच्या कानपूरमधील एका मशिदीत हे आठ जण राहत होते. पोलीस आउटपोस्ट इंचार्ज अब्दुल कलाम यांनी सांगितले, की तबलिघी जमात कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे आठ परदेशी नागरिक बाबुपुरवा परिसरातील एका मशिदीमध्ये राहत आहेत, अशी आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानुसार तिथे जाऊन तपास केल्यानंतर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे नागरिकी राजस्थानमार्गे २१ मार्चला कानपूरमध्ये पोहोचले होते. त्यांनी पोलिसांना त्यांच्याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. तसेच ते शहरामध्ये फिरतानाही आढळून आले होते. त्यामुळे या सर्वांना ताब्यात घेऊन लाला लजपतराय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांचे पारपत्रही जप्त करण्यात आल्याची माहिती कानपूरचे पोलीस महासंचालक अनंत देव तिवारी यांनी दिली आहे. या सर्वांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : मर्सिडीझने अशी केली कोरोना रुग्णांना मदत