एकोणिसाव्या शतकात जगाने दोन महायुद्धे पाहिली. सत्ता स्पर्धा आणि जागतिक राजकारणात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी या महायुद्धामध्ये सहभाग घेतला. १९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. या विनाशकारी महायुद्धाला २ सप्टेंबर २०२०ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसरे महायुद्ध होण्यामागे नेमकी काय पार्श्वभूमी होती, किती राष्ट्रांनी या जागतिक महायुद्धात सहभाग घेतला, त्याची त्यांना कशी किंमत मोजावी लागली. जागतिक राजकारणावर या महायुद्धाचे काय परिणाम झाले, याचा आढावा घेणारी विशेष स्टोरी...
दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये सहभागी गट -
युद्धासाठी दोन प्रतिस्पर्ध्यांची आवश्यकता असते हा युद्धाचा नैसर्गिक नियम आहे. दुसऱ्या महायुद्धामध्येही जगातील विविध सत्ता दोन गटांमध्ये विभागल्या गेल्या होत्या. 'अक्ष राष्ट्रे' आणि 'मित्र राष्ट्रे' असे दोन गट जागतिक राजकारणाच्या पटलावर तयार झाले.
अक्ष राष्ट्रे - जर्मनी, जपान आणि इटली हे तीन देश अक्ष गटातील प्रमुख देश होते. याच गटात बल्गेरिया, हंगेरी, रोमानिया व जर्मन निर्मित क्रोएशिया आणि स्लोव्हाकिया यांचाही समावेश होता.
मित्र राष्ट्रे - या गटामध्ये युनायटेड स्टेट्स(अमेरिका), ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि सोव्हिएत युनियन ही प्रमुख राष्टे होती. १९३९ ते १९४४ च्या दरम्यान या गटात कमीतकमी ५० देश समाविष्ट झाले. १९४५ अखेरीस यात आणखी १३ देशांचा समावेश झाला. यात ऑस्ट्रेलिया, बेल्जिअम, ब्राझील, ब्रिटिश राष्ट्रकुलातील देश, कॅनडा, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, झेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, ग्रीस, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, फिलीपीन्स आणि युगोस्लोव्हिया यांचाही समावेश होतो.
दुसऱ्या महायुद्धाचे कर्ते-धर्ते:
महायुद्धामध्ये दोन्ही गटातील काही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. अक्ष राष्ट्रांच्याबाजूने जर्मनीचा हुकुमशाहा अडॉल्फ हिटलर, डेर फ्युरर, जपानचे पंतप्रधान अॅडमिरल हेईकी तोजो, इटलीचे पंतप्रधान बेनिटो मुसोलिनी यांनी आपले योगदान दिले होते. तर, मित्र राष्ट्रांच्याबाजूने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट, ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि सोव्हिएत युनियनचे जनरल जोसेफ स्टॅलिन यांनी योगदान दिले.
दुसऱ्या महायुद्धाचा घटनाक्रम -
- १९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या काळात खेळल्या गेलेल्या महायुद्धाचा भडका काही अचानक उडाला नाही. काळाच्या ओघात घडत गेलेल्या अनेक घटनांचीमालिका जोडत जाऊन संपूर्ण दुसरे महायुद्ध समोर आले.
- १ सप्टेंबर १९३९ - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. अल्पावधितच डेन्मार्क, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, बेल्जिअम आणि फ्रान्स जर्मनीच्या अधिपत्याखाली आली.
- १० जून १९४० - ब्रिटन आणि फ्रान्सच्या विरोधात इटलीने जर्मनीच्याबाजूने सहभागी होत युद्धाचे रणशिंग फुंकले.
- १४ जून १९४० - जर्मन सैन्याचे पॅरिसवर आक्रमण.
- जुलै १९४० ते सप्टेंबर १९४० - या तीन महिन्याच्या कालावधीत जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन या दोन सत्तांनी ब्रिटनच्या किनारी भागात हवाई युद्ध केले.
- ७ सप्टेंबर १९४० ते मे १९४१ - जर्मनीने ब्रिटनची राजधानी लंडनवर रात्रीची बॉम्बफेक सुरू केली. या हल्ल्याला 'बिल्टझ्' असे म्हटले जाते.
- २२ जून १९४१ - जर्मनीने सोव्हिएत युनियनवर आक्रमण केले.
- ७ डिसेंबर १९४१ - जपानने अमेरिकेचे नाविक तळ असलेल्या पर्ल हार्बर या बेटावर हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेची लढाऊ विमाने युद्ध नौकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
- ८ डिसेंबर १९४१ - जपानच्या हल्ल्यानंतर चवताळलेल्या अमेरिकेने जपानविरोधात युद्ध पुकारून दुसऱया महायुद्धात प्रत्यक्ष उडी घेतली.
- ११ डिसेंबर १९४१ - जर्मनी आणि इटलीने अमेरिकेविरोधात युद्घ घोषित केले.
- फेब्रुवारी १९४२ - जपानने मलय पेनिसुलावर आक्रमण केले. एका आठवड्याच्या आत सिंगापूरने शरणागती पत्कारली.
- १९ ऑगस्ट १९४२ - जर्मनी व रशियाचे स्टॅलिनग्राड युद्ध सुरू झाले.
- १० जुलै १९४३ - मित्र राष्ट्रांच्या फौजा इटलीमध्ये दाखल.
- २५ जुलै १९४३ - बेनिटो मुसोलिनीला अटक.
- ६ जून १९४४ - हा दिवस 'डी' डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी मित्र राष्ट्रांच्या फौजा नॉर्मंडीच्या पाच किनाऱ्यांवर दाखल झाल्या. यात उटाह, ओमाह, गोल्ड, ज्युनो आणि स्वॉर्डचा या किनाऱ्यांचा समावेश होता. सैन्यामध्ये ५ हजार नौका, ११ हजार विमाने आणि दीड लाख सैनिकांचा समावेश होता.
- २५ ऑगस्ट १९४४ - अमेरिका आणि फ्रान्स मुक्ती सैन्याने पॅरिसला मुक्त केले.
- १२ एप्रिल १९४५ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांचे निधन. हेन्री ट्रूमन यांनी राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली.
- २८ एप्रिल १९४५ - बेनिटो मुसोलिनीचा मृत्यू
- ३० एप्रिल १९४५ - जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरने पत्नीसमवेत आत्महत्या केली.
- ७ मे १९४५ - जर्मनीची शरणागती.
- ८ मे १९४५ - युरोपच्या भूमीवरील दुसरे महायुद्ध संपले.
- १६ जुलै १९४५ - अणुबॉम्बची न्यू मेक्सिकोमध्ये यशस्वी चाचणी.
- ६ ऑगस्ट १९४५ - अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर 'लिटिल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला. यात १ लाख ४० हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
- ९ ऑगस्ट १९४५ - अमेरिकेने जपनच्या नागासाकि शहरावर 'फॅट मॅन' नावाचा दुसरा अणुबॉम्ब टाकला. यात ८० हजार नागरिक मारले गेले.
- १४ ऑगस्ट १९४५ - जपानने माघार घेण्याचे मान्य केले.
- २ सप्टेंबर १९४५ - जपानने युद्धातून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा.
दुसऱ्या जागतिक महायुद्धात झालेली हानी -
दुसरे महायुद्ध हे जगाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात ६ ते ८ कोटी लोकांचा मृत्यू झाला यात एकट्या ज्यू समुदायातील ६० लाख नागरिकांचा जीव गेला. एकूण मृत्यूंमध्ये प्रत्यक्ष सैन्यासोबतच ५ कोटी सामान्य नागरिकांचाही बळी गेला. लाखो लोक जखमी आणि बेघर झाले. या जागतिक महायुद्धाचा फटका प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जवळपास जगातील सर्वच राष्ट्रांना बसला.
दुसऱ्या महायुद्धात सहभागी देशांची झालेली सैन्य हानी -
- सोव्हिएत युनियन - ७५ लाख सैनिकांचा मृत्यू तर ५० लाख सैन्य जखमी.
- युनायटेड स्टेट्स(अमेरिका) - ४ लाख ५ हजार ३९९ सैनिकांचा मृत्यू तर ६ लाख ७० हजार ८४६ सैनिक जखमी.
- ऑस्ट्रेलिया - २३ हजार ३६५ सैनिकांचा मृत्यू तर ३९ हजार ८०३ सैनिक जखमी
- ऑस्ट्रीया - ३ लाख ८० हजार सैनिकांचा मृत्यू तर ३ लाख ५० हजार ११७ जखमी.
- बेल्जिअम - ७ हजार ७६० सैनिकांचा मृत्यू तर १४ हजार ५०० जखमी.
- बल्गेरिया - १० हजार सैनिकांचा मृत्यू तर २१ हजार ८७८ जखमी.
- कॅनडा - ३७ हजार ४७६ सैनिकांचा मृत्यू तर ५३ हजार १७४ जखमी.
- चीन - २२ लाख सैनिकांचा मृत्यू तर १७ लाख ६२ जखमी.
- फ्रान्स - २ लाख १० हजार ७६१ सैनिकांचा मृत्यू तर ३ लाख ९० हजार जखमी.
- जर्मनी - ३५ लाख सैनिकांचा मृत्यू तर ७२ लाख ५० हजार जखमी.
- ग्रेट ब्रिटन - ३ लाख २९ हजार २०८ सैनिकांचा मृत्यू तर ३ लाख ४८ हजार ४०३ जखमी.
- हंगेरी - १ लाख ४० हजार सैनिकांचा मृत्यू तर ८९ हजार ३१३ जखमी.
- इटली - ७७ हजार ४९४ सैनिकांचा मृत्यू तर १ लाख २० हजार जखमी.
- जपान - १२ लाख १९ हजार मृत्यू तर २ लाख ९५ हजार २४७ जखमी.
- पोलंड - ३ लाख २० हजार सैनिकांचा मृत्यू तर ५ लाख ३० हजार जखमी.
- रोमानिया - ३ लाख मृत्यू तर जखमींची संख्या समोर आलेली नाही.