कोटा (राजस्ठान) - इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही कोटा येथे शिकणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तेथून माघारी परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस पाठवल्या आहेत. रात्री उशिरा अशा 71 बसचा ताफा कोटा शहरात पोहोचला. आज (गुरुवार) दुपारी या बसेसमधून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांकडे विद्यार्थी प्रस्थान करतील. ज्यामध्ये 2100 हून अधिक मुले आपल्या मूळ जिल्ह्यात जाणार आहेत.
हेही वाचा... Coronavirus : पुण्यातील 'या' रुग्णालयात रोबोट करतोय कोरोनाबाधित रुग्णांची सेवा
कोटा येथून या सर्व बसेस महाराष्ट्रातील सहा वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागून पाठवल्या जातील.ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या विभागांचा समावेश आहे. यासाठी मुंबई आणि पुण्यातील मुलांना दुपारी 3 वाजता आपली उपस्थिती नोंदवायची आहे. याशिवाय नाशिक आणि औरंगाबाद विभागातील मुलांना सायंकाळी 4 वाजता आपली उपस्थिती नोंदवावी लागेल. तर नागपूर आणि अमरावती विभागातील मुलांना संध्याकाळी 5 वाजता उपस्थिती द्यावी लागेल. महाराष्ट्र सरकारने पाठवलेल्या या सर्व बसेसचे शहरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
खालील सहा विभागात विद्यार्थ्यांना पोहचवले जाणार :
मुंबईच्या बसमध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथील मुलांना पाठवण्यात येणार आहे.
पुण्याच्या बसमध्ये कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर येथील विद्यार्थी आणि त्यांचे पालक जातील.
नाशिक येथील बसमधून अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुबार जिल्ह्यातील विद्यार्थी परत येतील.
औरंगाबादच्या बसेसमधून बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील विद्यार्थी जातील.
नागपूरकडे जाणाऱ्या बसमधून भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा गोंदिया आणि गडचिरोलीतील विद्यार्थी परत येतील.
अमरावतीकडे जाणाऱ्या बसमधून अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम येथील विद्यार्थी परत येतील.