नवी दिल्ली - देशभरात लवकरच सात नवे बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू होत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यामध्ये हैदराबाद ते मुंबई या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अन्य सहा मार्गांवर बुलेट ट्रेन धावणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी 10 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या सर्व प्रकल्पांपैकी हैदराबाद ते मुंबई मार्गावर लवकरच काम सुरू होणार आहे. यामुळे देशभरातील मोठी शहरं आर्थिक राजधानीला जोडण्यात येतील. यामध्ये मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा देखील समावेश आहे. यामुळे देशातील मोठ्या शहरांमधील अंतर कमी होणार आहे.
केंद्र सरकारने नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला या महत्त्वकांक्षी प्रकल्पांबद्दल आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याची अंदाजे किंमत 10 लाखांच्या घरात असेल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन प्रकल्पांची माहिती
मार्ग /अंतर
1. मुंबई ते हैदराबाद - 711
2. चेन्नई ते म्हैसूर - 435
3. दिल्ली ते वाराणसी - 865
4. मुंबई ते नागपूर - 753
5. दिल्ली ते अहमदाबाद - 886
6. दिल्ली ते अमृतसर - 459
7. वाराणसी ते हावडा - 760
मुंबई ते अहमदाबाद असा एकूण 508 किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी केंद्र सरकारने याआधीच बुलेट ट्रेनची घोषणा केली होती. यासाठी जपान सरकारसोबत करार झाला आहे. त्याची किंमत 1.08 लाख कोटींच्या घरात आहे. मात्र कोरोनामुळे या प्रकल्पाची तारीख पुढे ढकलली असून 2028 पर्यंत तो पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. यासाठी 68 टक्के जमिनीचे अधिग्रहण झाली आहे.