तिरूवअनंतपुरम - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील दारुची दुकाने बंद आहेत, त्यामुळे तळीरामांची चांगलीच अडचण होत आहे. केरळमधील काही तरुणांनी यावर उपाय शोधून काढत, घरीच दारू तयार केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी या सात तरुणांना ताब्यात घेतले आहे.
देशभरात लॉकडाऊन लागू केल्यांनतर दारूची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी असे जाहीर केले होते, की डॉक्टरांची परवानगी असल्यास संबंधित व्यक्तीला दारु देण्यात यावी. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर स्थगिती आणली.
यानंतर, अलापुळा जिल्ह्यातील काही तरुणांनी यूट्यूबवर पाहून घरच्या घरीच दारू तयार केली. याठिकाणी छापा मारल्यानंतर पोलिसांनी चार तरुणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून २०० लिटर कच्चा माल जप्त केला आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क पथकचे प्रमुख सुमेश जेम्स यांनी दिली. यासोबतच जिल्ह्यात दुसऱ्या एका ठिकाणी असाच छापा मारून तीन तरुणांना अटक करण्यात आली, तर त्यांच्याकडून ८० लिटरचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीदेखील अबकारी अधिकाऱ्यांनी आपल्याच विभागाच्या एका माजी अधिकाऱ्याला अटक केली होती. या अधिकाऱ्याकडून सुमारे ५०० बनावट स्टिकर्स आणि बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा : कोरोनाच्या रुग्णांसाठी सशस्त्र सेना दल उभारत आहे ५१ नवी रुग्णालये..