उधमपूर - जम्मू कश्मीरमध्ये कडक लॉकडाऊन लागू केल्यानंतर अवैधपणे ट्रकमधून वाहतुक करणाऱ्यांवर चिनौनी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ट्रक चालकावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्रकमध्ये बसून लपून प्रवास करणाऱ्या 55 जणांना प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणात पाठवले आहे.
पोलीस निरीक्षक पुष्पेंद्र सिंह यांच्या नेतृत्त्वात एसडीपीओ मोहम्मद शफी यांनी मोटर शेड परिसरात नाकाबंदी केली होती. यावेळी वाहनांच्या तपासणी दरम्यान एका ट्रकला चौकशीसाठी थांबवण्यात आले. तपासणी सुरू असताना ट्रकमध्ये 55 जण बसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक चालक जावेद अहमद याला ताब्यात घेतले. तो त्राल सेक्टरमधील पुलवामाचा रहिवासी आहे.
ट्रकमध्ये लपून प्रवास करणाऱ्या 55 व्यक्तींमध्ये 25 पुरुष, 12 महिला तर 14 लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत त्यांना क्वारन्टाइन केले आहे. चालकाला जामीन मिळाल्यानंतर त्याला सोडण्यात आले आहे. अधिक तपास चिनौनी पोलीस करत आहेत.