तिरुवअनंतपूरम - केरळमधील एका कारागृहातील तब्बल २१७ कैदी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज(शनिवार) नव्याने ५३ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तिरुवअनंपूरममधील पुजाप्पाऊरा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. बाधितांमध्ये कारागृहाच्या रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
दोन कारागृह साहाय्यकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्या कैद्यांना इतर कैद्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. कैद्यांवर उपचार करण्यासाठी कारागृहातच एक विशेष कोरोना वॉर्ड सुरु करण्यात आला आहे. मागील आठवड्यात १०० कैद्यांची चाचणी करण्यात आली होती, त्यातील ४१ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते, तर आज ११५ जणांची आणखी चाचणी करण्यात आली आहे.
पुजाप्पाऊरा मध्यवर्ती तुरुंगात एकूण ९७५ कैदी आहेत. १०० च्या गटाने दररोज कैद्यांची चाचणी करण्यात येत आहे. कैद्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्याने प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत. केरळ राज्यात सद्यस्थितीत १४ हजार १४६ अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत, तर १३९ जणांचा मृत्यू झाला आहे.