श्रीनगर : गुरुवारी रात्री उशीरा जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले असून, तीन सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सीमेवर ही चकमक झाल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानने उकसवले..
पाकिस्तानी सैन्याने अचानक गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले करत भारतीय सैन्याला उकसवण्याचा प्रयत्न केला. पूंछच्या मानकोट सेक्टरमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये नागरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाच सैनिक ठार, काही बंकरही उद्ध्वस्त..
पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कृत्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले असून, त्यांचे काही बंकरही उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास दोन तास ही चकमक सुरू होती. यामध्ये भारताचा एकही जवान जखमी झाला नाही.
यावर्षी ३ हजारांहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन..
यावर्षी आतापर्यंत तब्बल ३,२००हून अधिक वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये आतापर्यंत ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून, १००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
हेही वाचा : रेल्वे रुळांवर कब्जा करू, शेतकरी आंदोलकांचा सरकारला इशारा