श्रीनगर - जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये जून महिन्यात 48 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याची माहीती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी पुंछ जिल्ह्यात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी सिंग पुढे बोलताना म्हणाले, की 'सुरक्षा दलांनी या महिन्यात विविध दहशतवादी विरोधी कारवाया केल्या. त्यात 48 दहशतवादी ठार झाले, ठार झालेल्यांमध्ये अनेक कमांडरचाही सामवेश आहे. 2020 मध्ये आत्तापर्यंत 128 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
128 दहशतवाद्यांपैकी 70 हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचे तर लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या संघटनांमधील प्रत्येकी 20 दहशतवादी ठार केले. इतर संघटनांमधीलही काही दहशतवादी ठार करण्यात आले. शनिवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. या दोन दहशतवाद्यांनी मागच्या आठवड्यात एका पाच वर्षीय मुलीची आणि सीआरपीएफ जवानाची हत्या केली होती, असे सिंग यांनी सांगितले.
पाकिस्तानात दहशतवादी तळ अॅक्टिव्ह असून तेथील दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मागील काही दिवसांत असे अनेक प्रयत्न सुरक्षा दलांनी उथळून लावले आहेत, आणि पुढेही लावू. स्थानिक तरुण दहशतवादी संघटनेत जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सिंग म्हणाले.