हैदराबाद - देशात काल २४ तासात ४७ हजार ९०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, तर ५२ हजार ७१२ नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यातील ७८ टक्के रुग्ण हे १० राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
दरम्यान, कोरोनाविरुद्ध लस शोधण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बायोटेक्नॉलॉजी विभागाला ९०० कोटींचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
मुंबई - राज्यात आज ७ हजार ८०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ५ हजार ६४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४४ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४ हजार ४९६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२२ करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५ हजार ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
दिल्ली - काल दिल्लीत सर्वात जास्त ८ हजार ५९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळू आले. दरम्यान, कोविडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने प्रदेशातील ३३ रुग्णालयांमधील ८० टक्के आयसीयू बेड्स हे कोविड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीष खंडपीठाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती दिल्ली उच्च न्यायालयाने उठवली आहे.
राजस्थान - काँग्रेस नेते सचीन पायलट यांना कोरोना झाला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी कोरोना चाचणी करवी, असे आवाहन त्यांनी केले.
उत्तराखंड - मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा काल आढावा घेतला. त्यानंतर रावत यांनी प्रशासनाला सणांदरम्यान कोरोना चाचणींची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राज्यातील नागरिक हे कोरोनाबाबत सर्व नियम पाळत असल्याची खातरजमा करण्याचेही सांगितले आहे.
तामीळनाडू - सरकारने १६ तारखेपासून १०० लोकांच्या उपस्थितीत सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली होती. मात्र, कोविड १९ पासून सुरक्षा करण्याबाबत नागरिकांकडून हयगय होत असल्याने राज्य सरकारने ही परवानगी नाकारली आहे.
पश्चिम बंगाल - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा पातळीवर अंतिम चाचणी पूर्व परिक्षेला बसण्याची गरज नाही, अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
हेही वाचा- 'जनतेने आम्हाला कौल दिला, मात्र, निवडणूक आयोगानं एनडीएला जिंकवलं'