नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे सवाई मानसिंह रुग्णालयातील 4 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे.
वैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सवाई मानसिंह रुग्णालयातील 3 डॉक्टर आणि महिला रुग्णालयातील 1 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये 3 निवासी डॉक्टर आणि सहाय्यक प्राध्यापक यांचा समावेश आहे. त्याच राज्यात आतापर्यंत 100 हून अधिक कोरोना वॉरियर्सना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान शुक्रवारी सवाई मानसिंह रुग्णालयात सुरक्षा रक्षकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
डॉक्टरच नव्हे तर पोलीस, नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉय आणि सफाई कामगार इत्यादींना कोरोनाची बाधा होत आहे. दरम्यान, मानसिंह रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरासाठी क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकार देशात कोरोनाच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. देशात एका दिवसात तब्बल 95 हजार कोरोना चाचणी करण्याची क्षमता आहे.