रायपूर - झारखंड येथील गिरिडीहमध्ये एका विहिरीमध्ये आईसह तीन मुलींचे मृतदेह आढळून आले आहे. गावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, त्यांची हत्या केली असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीतून चौघांचे मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यामध्ये कोडरमा येथील रहिवासी दीपू चौधरी यांची पत्नी रूबी देवी (३०), मुलगी अमृता कुमारी (६), ऋतिका कुमार (३) आणि गुंजन कुमारी (२), यांचा समावेश आहे. या घटनेची महिलेच्या माहेरी माहिती होताच सर्व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महिलेच्या पतीला घटनास्थळी आणून त्याला मारहाण केली. तसेच सासरच्या लोकांनी हत्या केली असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल.
तिसरीही मुलगी झाल्यामुळे रूबीचा छळ
'रूबीने तिसऱ्यांदा मुलीलाच जन्म दिल्याने तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला. तसेच पती देखील मारहाण करायचा. घटनेच्या १० दिवसांपूर्वीच तिला मारहाण केली असता आम्ही सर्वजण गेलो होतो. त्यावेळी हे आमचे कौटुंबीक भांडण आहे. त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका, असे जावयाने म्हटले होते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रूबी आपल्या तीन मुलींसह घरून निघून गेल्याचे जावयाने फोन करून सांगितले. त्यानंतर विहिरीमध्ये त्यांचे मृतदेह मिळाले', असे रूबीच्या आईने सांगितले.
हत्या झाल्याचा संशय -
ज्या विहिरीमध्ये मृतदेह आढळून आले, तिथे पाणी कमी होते. तसेच चौघींच्याही तोंडातून रक्त बाहेर येत होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे गावा पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय केरकेट्टा यांनी सांगितले.