नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवंसेदिवस रुग्णांच्या आकडेवारीत विलक्षण वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत तब्बल ३४ हजार ८८४ ने वाढ झाली आहे. तर तब्बल ६७१ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या आकडेवारीबरोबर देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १० लाख ३८ हजार ७१६ इतका झाला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सध्या एकूण ३ लाख ५८ हजार ६९२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ७५१ कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या २४ तासामध्ये तब्बल ६७१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा २६ हजार २७३ वर पोहोचला आहे.
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात तब्बल ८ हजार ३०८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राजधानी दिल्लीत मागील 24 तासात १ हजार ४६२ नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा हा आता १ लाख २० हजार १०७ आहे.
शुक्रवारपर्यंत देशात एकूण १ कोटी ३४ लाख ३३ हजार ७४२ कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या आहेत. त्यापैकी ३ लाख ६१ हजार ०२४ टेस्ट शुक्रवारी घेण्यात आल्या असल्याची माहिती आसीएमआरने दिली.