नागौर (राजस्थान) - उत्तर प्रदेशच्या बलरामपूर आणि सिद्धार्थनगर या दोन जिल्ह्यातील 30 कामगार गेल्या आठ-दहा महिन्यांपासून नागौरमध्ये लोहारांच्या वस्तीत राहत आहेत. येथे ते रोजंदारीचे काम करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सर्व अडकून पडले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असून कधीकधी फक्त चहावर दिवस काढावा लागत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारांकडून कोणीही भुकेले राहणार नाही, असा दावा केला जात असला तरी, या कामगारांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्याकडील पैसे संपले असून उधारीवरही साहित्य देणे किराणा दुकानदारांनी बंद केले आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांकडून जी काही मदत मिळेल, त्यावरच कसेबसे दिवस काढणे सुरू आहे. या कामगारांवर नाईलाजास्तव आता इतरांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे.
सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी सरकारकडून सांगण्यात येत असले तरी, छोट्या-छोट्या तीन खोल्यांमध्ये हे 30 कामगार येथे राहत आहेत. त्यामुळे सुरक्षित अंतर कसे राहणार? हा प्रश्न आहे. येथील जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की, जिल्हाभरात कोठेही खाण्या-पिण्याचे लोकांचे हाल होत नाहीत. मात्र, येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर ह्या कामगारांचे हाल सुरू असल्याचे चित्र आहे. या लोकांनी आपापल्या गावी जाण्याची मागणी केली आहे.